सार्वभौम राष्ट्र ई-पेपर
कृषी

ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘उमेद’ अभियान वरदान ठरत आहे

सार्वभौम राष्ट्र • 23 October 2026, 11:24 AM

अंबरनाथ / प्रतिनिधी:

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि लघुउद्योगांच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करण्याच्या उद्देशաने ‘उमेद अभियान’ (MSRLM) ग्रामीण भागात एक यशस्वी पर्व ठरत आहे. ‘उद्योजक निर्माण फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष सुभाष खैरनार यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामीण महिला आणि तरुणांसाठी या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.

​उमेद अभियानांतर्गत महिलांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत, ज्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

​महिला बचत गट (SHG) स्थापना: १० ते २० महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करत असून, यादरम्यान आपत्कालीन प्रसंगी अत्यंत कमी व्याजाने कर्ज व बचतीची सवय लागण्यास मदत होत आहे.

​समुदाय गुंतवणूक निधी (CIF) व फिरता निधी: नियमानुसार चालणाऱ्या बचत गटांना शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जात आहे, ज्यामुळे घरगुती गरजा व छोटे व्यवसाय सुरू करणे सोपे झाले आहे.

​बूक लिंकेज व सुलभ कर्ज: बँकांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, किराणा दुकान, पशुपालन आणि हस्तकला यांसारख्या उद्योगांसाठी ४ लाखांपर्यंतचे कर्ज अगदी कमी किंवा शून्य व्याजदराने उपलब्ध होत आहे.

​सूक्ष्म उद्यम विकास व बाजारपेठ: नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रँडिंग, पॅकेजिंग तसेच तालुका व जिल्हा पातळीवर उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून दिली जात आहे.

​विशेष 'सखी' योजना: ग्रामीण भागात रोजगार व मानधनासाठी 'बँक सखी' (बँकिंग व्यवहारात मदत), 'पशू सखी' (जनावरांचे आरोग्य व उपचार) आणि 'कृषी सखी' (आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार) यांसारख्या पदांवरून महिलांना रोजगाराची संधी मिळत आहे.

​कौशल्य विकास प्रशिक्षण (DDU-GKY): ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी किंवा स्व-उद्योगासाठी सहकार्य केले जात आहे.

​योजनांचा लाभ कसा घ्यावा?

ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या गावातील प्रभाग संघ (VO) किंवा सीआरपी (CRP) यांच्याशी संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायत व पंचायत समितीमधील 'उमेद' अभियानाच्या तालुका कार्यालयात अर्ज करून नवीन बचत गट स्थापन करावा, असे आवाहन उद्योजक निर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष खैरनार यांनी केले आहे.

​अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी उद्योजक निर्माण फाऊंडेशन, संस्थापक अध्यक्ष सुभाष खैरनार (मोबाईल: ९३२२०५८०९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)